Saturday, May 25, 2013

Broccauliflower Upkari 
 
"Research shows that ...." या वाक्याचा मी हल्ली धसकाच घेतला आहे. आपण मारे आरोग्यासाठी उत्तम म्हणून एखादी गोष्ट आहारात नियमितपणे वापरावी किंवा नियंत्रित करावी आणि लगेच काही महिन्यात त्याच्या अगदी विरुद्ध वाचायला मिळतं. सोयाबीन, दूध, गहू, मका, अंडी, मासे (Mercury content/farmed or caught in wild), nonstick भांडी, microwave...
म्हणजे नक्की खायचं तरी काय? या यादीत आत्ता भर पडली आहे ती खोबरेल तेलाची. अगदी परवा परवापर्यंत Sautrated Fats साठी उपेक्षित राहिलेलं खोबरेल तेल आत्ता म्हणे आरोग्यवर्धक आहे. अर्थात आमच्या कोंकणी /सारस्वती स्वयंपाकात खोबरेल तेलाचा वापर असतोच म्हणा. पण गेल्या आठवडयात गुडीयाबरोबर "Whole Foods" मध्ये चक्कर मारताना "sample" साठी बिस्किटावर घट्ट खोबरेल तेलाचा लोण्यासारखा थर लावून चाखायला देत होते. वर खोबरेल तेल कस आरोग्यवर्धक असतं याबद्दल एक पुस्तिका! म्हणजे आमच्यासारख्या सतत गोंधळलेल्या ग्राहकांच्या गोंधळात आणखी भर! कसं ठरवायचं काय आरोग्याला चांगलं आणि काय वाईट ते?
मी हल्ली वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या वापरायला सुरुवात केली आहे. अशा भाज्यांमध्ये antioxidants भरपूर असतात. आता मी मारे antioxidants भरपूर म्हणून वापरणाऱ्या भाज्या genetically modified नसाव्यात आणि "organic" हा शिक्का असतो त्यामुळे त्या बहुदा अपायकारक तरी नसाव्यात हीच सदिच्छा!
आजची भाजी आहे "brocauliflower" ची! या भाजीची चव फ्लॉवरसारखीच असते पण फिक्कट हिरवा रंग असतो. मी ही भाजी कोंकणी पद्धतीने करायचं ठरवलं . त्यामध्ये विशेष मसाल्याचा मारा नसतो. मी फोडणीत खोबरेल आणि गोड्या तेलाचं मिश्रण घातलं आणि मोहरी,हिंग, उडीद डाळ, कढीलिंब , सुकी मिरची वगैरे घातली. अशा पद्धतीने केलेल्या भाजीला आम्ही उपकरी म्हणतो. बऱ्याचदा एखादी नवी भाजी करायची म्हटली की मी अशी उपकरी करते म्हणजे नव्या भाजीची चव चागली कळते.
Broccoliflower उपकरी
साहित्य
१ Broccoliflower
चवीनुसार मीठ
चवीनुसार थोडं खोबरं
फोडणीसाठी -
खोबरेल तेल किंवा गोडं तेल किंवा दोन्ही तेलं
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून उडीद डाळ
कडीपत्त्याची काही पाने
२-३ सुक्या मिरच्या
कृती
१. flower चे तुरे काढून मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
२. एका कढईत आवडीनुसार तेल घाला.
३. फोडणीचे साहित्य घालून खमंग फोडणी करून घ्या.
४. flower चे तुरे घालून चांगलं ढवळून घ्या.
५. झाकणावर पाणी ठेवून शिजू दया.
६. मीठ आणि खोबरं घाला.
टीप
१. ही भाजी फार शिजवू नये.
२. तुमच्या आवडीनुसार कुठचेही तेल वापरू शकता पण खोबरेल तेलाचा स्वाद या भाजीची चव नक्कीच वाढवतो.

No comments:

Post a Comment